मालेगाव :(प्रतिनिधी) सोने कारागीराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सुमारे ३२ लाखांच्या दागिण्यांची लूटमार प्रकरणाचा तपास लावण्यात छावणी पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये पाच अट्टल आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लुटमारीतील सुमारे २१ लाखांचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरातील संगमेश्वर भागातील डॉ.आमिन यांच्या हॉस्पिटल मागील गल्लीत (ता.१८) च्या रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. सोनार झुंबरलाल ज्वेलर्सचे मालक झुंबरलाल बागुल हे नेहमीप्रमाणे सोने-चांदीचे दागिने घेऊन घराकडे परतत असताना अॅक्टीव्हा गाडीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण वाडिले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला होता. तर स्थानिक गुन्हे शाखेने प्रारंभी या प्रकरणाचा समांतर तपास केला. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपासातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर गुप्त माहितीवरुन भाग्येश भगवान महाले (19, रा. चंदनपुरी गेट, हनुमान मंदिरासमोर) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत गणेश राजेंद्र वडगे (18, रा. सावता चौक, वडगे गल्ली, संगमेश्वर) व उबेद उर्फ बद्दे शमसोद्दीन अन्सारी (21, रा. काकुबाईचा बाग, संगमेश्वर) यांचा सहभाग स्पष्ट झाला. यातील उबेद हा सराईत गुन्हेगार असून, महाले पोलिसांच्या हाती लागल्याची कुणकूण लागताच दोघे फरार झाले.त्यांची शोधमोहीम राबवण्यात येऊन दोघांनाही जेरबंद करण्यात आले. त्यांच्या उलट तपासणीतून आसिफ इकबाल सईद अहमद उर्फ आसिफ टेलर (रमजानपुरा), जिशान अहमद नफिस अहमद (कुसुंबा रोड), ताहिर जमाल शाहिद जमाल उर्फ ताहिर डॉन (रा. गोल्डननगर), आमिर शहा अरमान शहा उर्फ इम्मू (सलीमनगर), मुशिर (पूर्ण नाव माहित नाही) व इम्मूचा मेहुणा भाईजान (सुरत) याचाही गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. हे सर्व गुजरात राज्यात लपून बसले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सुरतला पाठविण्यात आले. त्यातून आसिफ टेलर, जिशान अहमद यांना सुरतच्या पांडेसरा भागातील गोल्डन आवास परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. लुटमारीचे सोने नाशिकमधील मनिष रवींद्र सोनार (३३, रा. सरस्वती नगर, पंचवटी) याला विकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार पथकाने सोनारला ताब्यात घेत २१लाख ६० हजार ७८४ रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. पाच आरोपींना अटक झाली असून, चार आरोपी अद्याप फरार आहेत.पोलिस उपनिरीक्षक गणेश आखाडे, पोलिसनाईक अविनाश राठोड, शिपाई पंकज भोये, नितीन बारहाते, नरेंद्रकुमार कोळी, संजय पाटील, संदीप राठोड यांचा तपास पथकात समावेश होता.
Post a Comment