तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हजारो हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांचे अतोनात नुकसान.


सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हजारो हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्री झालेल्या या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व लहान- मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहिल्या. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री झालेल्या या पावसाने मागील विक्रम मोडीत काढले. तालुक्यात रात्री सरासरी 78 मि. मी. पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील काही गावांमध्ये जुन्या घरांची पडझड झाली असून दोन वर्षांपासून कोरडा असलेला निल्लोड प्रकल्प तुडुंब भरला आहे. सिल्लोड शहरातील काही भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. या पावसात धामणी- पिरोळा येथील मेंढपाळांच्या 25 मेंढया दगावल्या आहेत. रात्री झालेल्या या मुसळधार  पावसामुळे नागरिकांनी रात्र अक्षरशः  जागून काढावी लागली.

         तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून  शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मका, सोयाबीन, ज्वारी, कपाशी आदी पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली. तालुक्यात रात्री सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक 100 मि. मी. पाऊस निल्लोड मंडळामध्ये झाला. त्याखालोखाल भराडी 95, बोरगाव बाजार 84, अजिंठा 72, अंभई 69, गोळेगाव 68, आमठाणा 68, तर सिल्लोड मंडळात 67 मि. मी. पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने काही माती बांधांना फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेळीच दखल घेत सांडव्याची रुंदी वाढवल्याने संभाव्य धोका टळला.

       गेल्या पंधरादिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या ऐन सोंगनीच्या हंगामातच पावसाने लावून धरल्याने मकाच्या कणसांना कोंब फुटली आहे, तर कपाशीच्या परिपक्व कैऱ्या कुजत आहेत. गेल्या पंधरादिवसात तालुक्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अनेक रस्त्यांवरील वाहतुक ठप्प
रात्री झालेल्या या पावसामुळे अजिंठा- बुलढाणा मार्गावरील रायघोळ नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होती. शिवाय अंभई- उंडणगाव, उपळी- भराडी, केळगाव- आमठाणा, म्हसला- भराडी या रस्त्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्याने काही तास वाहतूक ठप्प होती. सिल्लोड- औरंगाबाद महामार्गावरील बनकिन्होळाजवळील पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी निल्लोड, सताळ पिंप्रीकडून वळवण्यात आली होती.


25 मेंढया दगावल्या


   रात्री झालेल्या या मुसळधार पावसात धामणी- पिरोळा येथील अशोक गोरे, शिवाजी गोरे, सखाराम गोरे या मेंढपाळांच्या 25 मेंढया दगावल्या आहेत. एकीकडे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले, तर दुसरीकडे मेंढया दगावल्याने या मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दगावलेल्या मेंढयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या मेंढपाळांनी केली आहे. दरम्यान पशुधन अधिकारी, तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला.

धानोरा येथे नागरिकांचे स्थलांतर

 
धानोरा येथील माती बांध तुडुंब भरुन सांडव्यातून पाणी निघाल्याने नदीला पूर आला. यामुळे शेतवस्त्यांवरील घरांना पाणी लागले होते. शिवाय माती बांध फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत शेतवस्त्यांवरील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले होते.

आता ओला दुष्काळ

      सलग दोन- तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला होता. यंदा पावसाच्या मेहेरबानीमुळे पिके जोमात आली होती. परंतु ऐन सोंगनीच्या हंगामात परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. यामुळे दोन- तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे, तर यंदा ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget