राहाता (तालुका प्रतिनिधी) अस्तगाव माथ्याजवळ भरधाव हुंडाई कारने पिंपरी निर्मळच्या दोन शेतकर्यांना मागील बाजूने धडक देऊन फरफटत नेल्याने दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना 4 वाजेच्या सुमारास अस्तगाव माथ्याजवळ हॉटेल साई किरणजवळ घडली. या भिषण अपघातात निर्मळ पिंपरी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ निर्मळ (वय 45) व विलास सोपान निर्मळ (वय 47) हे दोघे घटनास्थळीच मयत झाले. दोन्ही मयत पिंपरी निर्मळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी असून ते दोघे मोटारसायकलवरून राहाता बाजार समितीमध्ये जात असताना हॉटेल साई किरणसमोर बाभळेश्वरकडून राहात्याकडे भरधाव वेगात जाणार्या एमएच-17 बीएक्स-0081 या हुंडाई कारने त्यांना मागील बाजूने जोराची धडक देत 50 फूट फरपटत पुढे नेले. यातील बाळासाहेब निर्मळ यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास हा गंभीर जखमी झाला होता. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याचाही मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले यातील दोन्ही मृतदेह लोणी येथील प्रवरा रूग्णालयात नेण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहने राहाता पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
Post a Comment