राहाता (तालुका प्रतिनिधी)-साईदत्त अर्बन मल्टीपल निधी पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने राहाता परिसरातील खातेदार व ठेवीदारांच्या 45 लाख रुपयांचा अपहार केला आहे. ठेवीदार, खातेदारांची फसवणूक करून चेअरमन थोरात पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटून गेले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्वरित आरोपीस अटक झाली नाही तर याप्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा फसवणूक झालेल्या दैनिक बचत ठेव प्रतिनीधी व खातेदारांनी दिला आहे.खातेदारांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दैनिक बचत ठेव प्रतिनिधी संदीप गोर्डे यांनी म्हटले आहे की, साईदत्त अर्बन मल्टीपल निधी पतसंस्थेच्या साकुरी येथील शाखेतून चेअरमन नितीन थोरात व संचालक मंडळाने दैनंदिन बचत ठेव व मुदत ठेव ठेवलेल्या खातेदारांची अंदाजे 47 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. चेअरमन नितीन थोरात यांनी खातेदारांचे पैसे घेऊन पलायन केले आहे. दुष्काळी परिस्थितीत अर्बन मल्टीपल निधी साकुरी पतसंस्थेचे चेअरमन नितीन थोरात व संचालक मंडळ सर्व रा. वॉर्ड क्रमांक 1 अतिथी कॉलनी श्रीरामपूर तसेच सतीश केशवराव जाधव व अनिल जाधव, केशव गोविंदराव जाधव (सर्व रा. पुणतांबा) यांनी जाहिरातबाजी करून राहाता परिसरातील दैनिक बचत ठेव प्रतिनिधी व खातेदार तसेच मुदत ठेव योजनेचे खातेदार यांना आमिष दाखवून ऑक्टोबर 18 ते एप्रिल 19 या कालावधीमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करून घेतल्या होत्या. अडचणीच्या वेळेस ग्राहकांना पैसे काढण्याची गरज भासल्यास नंतर प्रत्येक खातेदारास चेअरमन नितीन थोरात यांच्याकडून आता पैसे शिल्लक नाहीत नंतर देऊ असे उडवाउडवीचे उत्तरे वारंवार मिळायची. पैसे मिळालेच नाही व आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच संदीप गोर्डे व दैनिक बचत ठेव प्रतिनिधी यांनी अहमदनगर येथे जाऊन यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.तेथील पोलीस उपअधीक्षक श्रीमती सोनवणे यांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर ती राहाता पोलीस स्टेशन येथे वर्ग केली होती. राहाता येथील पोलिस अधिकार्यांनी संबंधित आरोपीस 30 ऑगस्टपर्यंत मुदत लोकांचे पैसे परतफेड करण्यासाठी दिली होती. मात्र अद्यापपर्यंत पैसे परत मिळाले नाहीत. शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे आदेशान्वये 19 ऑगस्ट रोजी संदीप बोराडे यांचे फिर्यादीनुसार नितीन थोरात व संचालक मंडळ विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे तेरा दिवसांचे वर दिवस उलटूनही मात्र आरोपीस अटक न झाल्याने खातेदार व दैनिक ठेव बचत प्रतिनिधींमध्ये पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोपीस त्वरित अटक न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बचत ठेव प्रतिनिधी खातेदार व मुदत ठेव योजनेच्या खातेदारांनी दिला आहे.
Post a Comment