मेहकर :
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईचा डोक्यात कुऱ्हाड मारुन खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनी खुर्द येथील कमलबाई आत्माराम अवसरमोल (६४) आपल्या मुलासह राहत होत्या. मुलगा विनोद अवसरमोल याला दारुचे व्यसन होते. शनिवारी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विनोदने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. कुऱ्हाडीच्या घावामुळे रक्तस्त्राव होवून कमलबाई गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी त्यांना उपचाराकरिता येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार दीपक आत्माराम अवसरमोल (४४) यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरुन रविवारी सकाळी आरोपी विनोद अवसरमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.
Post a Comment