बलात्काराच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिसाला केले गजाआड.
अहमदनगर (प्रतिनिधी)-महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैदराबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.रामचंद्र पांडुरंग वैद्य (मूळ रा. बोधेगाव, ता. शेवगाव) या पोलीस कर्मचार्यास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याला जामीन मिळवून देण्यासाठी आणि तपासात त्याला मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकाकडे पोलिस कर्मचारी वैद्य यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.आरोपीच्या मामाने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नगरच्या पोलिसांनी सापळा रचला. पारनेरमधील एका हॉटेलमध्ये पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पोलिसाला पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपाअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस हवालदार तनवीर शेख, सतीष जोशी, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, हारूण शेख, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने केली.पकडण्यात आलेला पोलिस वैद्य पोलिस निरीक्षकाचा रायटर आणि तपासात मदत करणारा कर्मचारी आहे. त्याआधारे ही लाच स्वीकारून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याचे आणि पुढेही तपासात मदत करून सुटकेचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन त्याने आरोपीच्या मामाला दिले होते.