माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त,आमदार कानडेंनी दिली श्रीरामपूरकरांना वैचारिक मेजवानी.
श्रीरामपूर - प्रचंड गर्दी ...महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत साहित्यिकांना ऐकण्यासाठी जमलेला जनसागर ...तीन वेळा खुर्च्या मागवूनही कमी पडणारी जागा ...प्रत्येक वक्त्याला ऐकण्यासाठी तल्लीन झालेला श्रोता वर्ग ...श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे बोलत जाणारा वक्ता आणि शेवटी त्याला थांबवण्यासाठी दिली जाणारी आमदार कानडे यांची चिठ्ठी ...हे चित्र होते काल आमदार लहुजी कानडे यांच्या यशोधन या कार्यालयाच्या मागील प्रांगणात झालेल्या लोक हक्क फाउंडेशनच्या पुरस्कार वितरणाचे.निमित्त होते राज्याचे माजी महसूल मंत्री, सुसंस्कृत विचारांचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे.आमदार लहुजी कानडे, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, शिक्षक नेते अंकुश कानडे यांच्या नीटनेटक्या नियोजनातून साकार झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते दैनिक सकाळचे माजी संपादक, राज्यातील एक नामवंत विचारवंत,ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे. व्यासपिठावर उपस्थिती होती महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष,प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर,ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे पुतणे श्री भारदे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समिती श्रीरामपूरचे माजी सभापती,श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र इंद्रनाथ पाटील थोरात,कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांची. शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी आदींनी सभा मंडप खच्चून भरला होता.आमदार कानडे प्रमुख असलेल्या लोकहक्क फाउंडेशन तर्फे हा दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक भाषणामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी लोकहक्क फाउंडेशन मार्फत राबविल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती देताना ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्याचा उपक्रम आपण गेल्या काही वर्षापासून सुरू केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक, सेवाभावी कार्यकर्ते यांचा गौरव करतानाच तालुक्यातील ज्या भूमिपुत्रांनी विविध क्षेत्रांमध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे. त्यांचही गौरव या निमित्ताने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील सुमारे 80 गुणवंतांचा गौरव काल या समारंभात करण्यात आला. शिवाय राज्यातील नामवंत असे वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ साहित्यीक,प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर,तालुक्याचे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांना जीवनगौरव पुरस्कार यानिमित्ताने प्रदान करण्यात आले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास मांडला. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करीत असताना आजचे शासनकर्ते हे समाजामध्ये कशाप्रकारे द्वेष पसरवित आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी आपल्या मार्मिक भाषणातून समाजात सध्या सुरू असलेल्या दांभिकपणावर गंभीरपणे टीका केली. समाज जोडण्याऐवजी समाज तोडण्याचे काम कशा पद्धतीने होत आहे हे त्यांनी सोदाहरण नमूद केले.समारंभाचे प्रमुख अतिथी, दैनिक सकाळचे माजी संपादक, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांचे भाषण म्हणजे ओजस्वी विचारांची पेरणी होती. फुले,आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेताना आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने समाजाचे विघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.आपल्या अस्खलित वाणीने त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते बोलत असताना सभामंडपामध्ये अत्यंत शांतता होती. श्रीरामपूरला यापूर्वी सात आठ वेळा येऊन गेलो. भाषणे केली. मात्र आजच्या एवढी गर्दी यापूर्वी कधी नव्हती. याचे श्रेय आमदार कानडेंना जाते असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर आपल्या खणखणीत शैलीने प्रहार करताना त्यांनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या राज्यकर्त्यांच्या धोरणांचा देखील तडाखेबंद समाचार घेतला.आमदार कानडे यांच्या मैत्रीचा समर्पक उल्लेख करताना लहुजी कानडे यांच्या रूपाने विधिमंडळामध्ये बहुजन चळवळीचा एक चेहरा पोहोचला.साहित्यिक, कवि,अधिकारी म्हणून त्यांचे योगदान कदापि विसरता येणे शक्य नाही. आमच्यातला एक साहित्यिक विधिमंडळात लोक प्रतिनिधी म्हणून पोहोचला याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.अत्यंत निट नेटका, नियोजनबद्ध व देखणा समारंभ या निमित्ताने श्रीरामपूरकरांना अनुभवावयास मिळाला. उपस्थित सर्व श्रोत्यांनी देखील महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांचे विचार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीरामपूरकरांना ऐकायला मिळाले याबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला व आमदार लहुजी कानडे, अशोक नाना कानडे व त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ॲडवोकेट समीन बागवान यांनी केले तर ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नामवंत दिग्गज उपस्थित होते.
Post a Comment