राहुरी प्रतिनिधी-राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडलगत असलेल्या गोदामात ड्रग्जसदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे सव्वाकोटी रुपये किंमतीचा मोठा बेकायदा साठा आढळून आला. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पथकाने बुधवारी (दि.03) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली आहे.दरम्यान, घटनास्थळी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने येऊन संबंधित औषधांची तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. ही अंमली पदार्थांची तस्करी कोठे कोठे सुरू होती? या तस्करीत कोण कोण सामील आहेत? याचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे. उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले होते. तर मुद्देमालाची पॅकिंग करून ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. काल सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदा साठ्याची पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती.

याची खबर पोलीस पथकाला लागली. काल सकाळी राहुरी येथील चार ते पाचजणांची पोलीस पथकाने धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा, महिला पोलीस उप निरीक्षक ज्योती डोके, आदींसह डीवायएसपी पथकातील फौजफाट्याने दुपारी तीन वाजे दरम्यान राहुरी शहरहद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिवचिदंबर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्याठिकाणी उत्तेजित करणार्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणार्या गोळ्या तसेच ड्रग्जसारखा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
Post a Comment