क्रीडा प्रतिनिधी गौरव डेंगळे-भुवनेश्वर (ओडिशा) : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (VFI) ने आगामी १४ व्या यू १८ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी २० जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे.या संघामध्ये नेवासा येथील त्रिमूर्ती महाविद्यालयाची कु रक्षा खेनवार व पुण्याच्या डेक्कन जिमखानाची कु वेदिका शिंदे यांची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.कु वेदिका हि भारतीय महिला व्हॉलीबॉलचे नामांकित प्रशिक्षक श्री देविदास
जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना,पुणे येथे प्रशिक्षण घेते तर रक्षा ही ज्ञानेश्वर महाविद्यालय संचालित श्री यशवंत स्पोर्ट्स क्लब,नेवासा येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.कु रक्षाचे शालेय शिक्षण वर्धा जिल्ह्यातील कारंजा या गावी झाले व पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी नेवासा येथे प्रवेश घेतला.
६ ते १३ जुन या कालावधीत थायलंड मध्ये स्पर्धा होणार आहे. दि २१ व २२ एप्रिल रोजी भुवनेश्वर,ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीतून संभाव्य २० सदस्य भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड झालेले
खेळाडू दि २३ एप्रिल ते ४ जुन दरम्यान संघाचे सराव शिबिरामध्ये सहभागी होईल. निवड झालेल्या कु रक्षाचे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक जयंत पाटील, सचिव श्री विरल शहा तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment