मढी यात्रा कानिफनाथांचे दर्शन दोनशेच्या टप्प्याने,मढी यात्रा समितीच्या बैठकीत निर्णय कोविड नियम पाळून होणार दर्शन

अहमदनगर प्रतिनिधी-सरकारच्या निर्देशानुसार कोविडचे नियम पाळत श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी दोनशेच्या टप्प्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय यात्रा नियोजन बैठकीत करण्यात आला. तसेच पारंपरिक व आवश्यक सर्व विधी साजरे करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.मढी देवस्थान समितीच्या महाप्रसाद गृहासमोर यात्रा नियोजन समितीची बैठक प्रभारी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, गटविकास अधिकारी शितल खिंडे, यासह परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, वनविभाग, वीज वितरण, नगरपालिका अशा प्रमुख यंत्रणाचे प्रतिनिधी, देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, सचिव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, विश्वस्त शामराव मरकड, शिवजीत डोके, भऊसाहेब मरकड, डॉ.विलास मढीकर, माजी सरपंच देवीदास मरकड, बाबासाहेब मरकड, ग्रामस्थ नवनाथ मरकड, डॉ. रमाकांत मडकर, लक्ष्मण मरकड आदी उपस्थित होते.मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत तीन टप्प्यांमध्ये होते. होळी, रंगपंचमी व अमावस्येला भरणारी फुलोर बाग यात्रा असे टप्पे असून रंगपंचमी टप्पा सर्वाधिक मोठा असतो. राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी भाविकांना दर्शन घेऊन लगेच माघारी फिरावे लागेल. रंगपंचमीच्या दिवशी मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला लावून त्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली जाते. समाधी मंदिरासमोरील गर्दी टाळण्यासाठी अशा भाविकांना मंदिर परिसरात थांबण्यास बंदी असून यात्रेसाठी खास तयार करण्यात आलेल्या पटांगणात जाऊन पारंपरिक विधी करून माघारी फिरावे लागेल.अमावस्येच्या दिवशीची कावड यात्रा व निशान भेट मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत होईल. गेल्या दोन वर्षापासून यात्रा बंद राहून यंदाही कोविडचे निर्बंध पाळून भावीकांना यात्रेस परवानगी मिळाल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यावेळी माहिती देताना आगार प्रमुख महेश कासर म्हणाले, एस टीचा संप मिटला नसला तरी जिल्ह्यातून एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण क्षमतेच्या सुमारे 25 टक्के बसेस आगारातून सुरू झाल्या आहेत. मढी येथून पैठणसाठी जादा गाड्या सुटतील. यात्रेदरम्यान चालणारे अवैध धंदे, दारू विक्री पूर्णपणे बंद करावेत, अशी मागणी अंबादास आरोळे यांनी केली.यावेळी अध्यक्ष मरकड म्हणाले, यात्रेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पूर्णपणे पालन करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या सर्व बाजूंनी सुमारे अडीचशे एकर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी हायमॅक्स, पथदिवे, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. मायंबावरून येणारे भाविकांना थेटपणे पाथर्डी-तिसगाव येथे सहजपणे जाता येईल. देवस्थान समीतीच्यावतीने पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. भाविकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर व भाविकांच्या संख्येसाठी निश्चित केलेली अट काढून दर्शन सोहळा संपेल.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget