नाशिक प्रतिनिधी- जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्याने विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अडवलेल्या फाइली जिल्हा परिषदेसह कार्यकारी अभियंत्यांच्या अंगलट आलेल्या असतानाच, आता जिल्ह्यातील चार आमदारांनीही कार्यकारी अभियंत्याविरोधात लेखी तक्रारी दिल्या आहेत . त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान, कार्यकारी अभियंत्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी मंत्रालयात बुधवारी (दि.9) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कार्यकारी अभियंत्यांनाही बोलविण्यात आले आहे.मागील दोन-तीन आठवड्यांपासून बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्यांच्या व्हीआयपी संस्कृती विरोधात सदस्य, पदाधिकार्यांसह ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कार्यकारी अभियंता भेटत नाही, कार्यालयात येत नाही, फाइली काढत नाही, पंचायत समितीत बसून कामकाज करतात, सदस्यांसह लोकप्रतिनिधींचे मोबाइल घेत नाहीत, अशा तक्रारी अभियंत्याविरोधात सुरू होत्या. यातच एक ठेकेदार अन् विभाग एकचे कार्यकारी अभियंता यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद थेट विभागीय आयुक्तांपर्यंत पोहचला होता.यातच विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील फाइलीही कार्यकारी अभियंता यांनी अडवल्या. या फाइली काढण्यासाठी स्वतः झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना केल्या. मात्र, त्यांच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवल्याने विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी थेट मंत्रालयात या कार्यकारी अभियंत्यांविरोधात तक्रार केली होती.अशा तक्रारी असतानाच जिल्ह्यातील चार आमदारांनीही कार्यकारी अभियंत्यांविरोधात लेखी तक्रारी केल्याचे असल्याचे समजते. कार्यकारी अभियंत्यांच्या कामकाजाविरोधात या तक्रारी असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रालयात बोलविलेल्या बैठकीवरून अडचणीत सापडलेले कार्यकारी अभियंता अजुनच अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Post a Comment