नाशिक प्रतिनिधी - गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू पंचवटी व नाशिक शहराला जोडणारा मोठा दुआ आहे. हा रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटीचे अधिकारी करत आहेत, असे सांगत त्याला आमचा विरोध असल्याचे रामसेतू बचाव अभियानच्या कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.रामसेतूमुळे नाशिक शहरातून पंचवटीला येण्यासाठी सोयीचे ठरते. या पुलावर गेल्या अनेक वर्षापासून शेकडो छोटे व्यावसायिक आपला रोजगार करून पोट भरत आहेत. हा रामसेतू कायमचा नष्ट करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.स्मार्टसिटी योजनेंतर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये - जा करण्यासाठी रामसेतूची मदत घ्यावी लागत आहे. रामसेतू तोडला तर नाशिक व पंचवटीतील रहिवाशांना जाण्यायेण्यासाठी प्रचंड अडचणीचे ठरणार आहे.तरी रामसेतू तोडण्यास आमचा कायमच विरोध राहील, विशेष म्हणजे रामसेतूची उभारणी इंग्रजकालीन आहे. तरीही रामसेतू अजून ताठ मानेने उभा आहे, अशी माहिती कल्पना पांडे यांनी दिली.रामसेतूवरून शेकडो वेळा गोदावरीच्या पुराचे पाणी गेले असतानाही रामसेतू तसाच आहे. शासनाचा विकास करण्याचा उद्देश असला तरी ऐतिहासिक स्थळे कशी शाबूत राहतील हा उद्देशही नजरेसमोर ठेवावा. ज्या स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रामसेतू तोडण्याचा प्रयत्न होत आहे, त्या स्मार्टसिटीच्या कामांचा दर्जा कसा आहे हे सांगणे नको. दोन-तीन महिन्यातच पुराच्या पाण्याने फरशा कशा वाहून गेल्या होत्या हे समोर आलेले आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या विकासाबाबत सुसूत्रता अजिबात नाही,असा आरोप त्यांनी केला.कारण नसताना रस्ते खोदायचे व दोन-तीन महिने तशाच अवस्थेत ठेवायचे, त्या खड्ड्याला बुजवण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा पदरात पाडून घ्यायचा हाच यामागील उद्देश आहे,असेही पांडे यांनी सांगितले.रामसेतू बचाव अभियान यशस्वी होण्यासाठी नाशिक शहरातील नागरिकांची सह्यांची मोहीम सुरु करण्यात येणार आहे . यावेळी पांडे यांच्यासह सुनंदा जगत, सुनंदा जगताप, स्वप्नील आहेर, सचिन खिंडारे, संदीप बोरकर, सुभाष पोतदार, संजय वाली उपस्थित होते.
Post a Comment