अहमदनगर प्रतिनिधी - गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून प्रभारी असलेल्या नगर शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार अनिल कातकडे यांनी स्वीकारला आहे. शहरातील वाढत्या चोर्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची उकल करण्यात आलेले अपयश त्याचबरोबर पोलीस ठाण्यात वाढती गटबाजी रोखण्याचे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यासमोर आहे.शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी कातकडे यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक ते उपअधीक्षक पदोन्नतीनंतर त्यांची नगर शहरासाठी नियुक्ती झाली आहे. पोलीस ठाण्यातील कामाचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्याचा उपयोग शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाण्यासाठी ते करतील, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर शहरातील चोरीच्या घटना, घरफोड्या, सावेडी उपनगरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.दुसरीकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तसेच शहरातील अवैध बायोडिझेल, कत्तलखाने, जुगार, दारूविक्री, गुटखा विक्री या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक पोलीस ठाण्याला आदेश देत किंवा स्वत: पथक स्थापन करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यापुढे आहे. चोर्या आणि अवैध धंद्यांबरोबर तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, अत्याचार अशा गुन्ह्यांत देखील वाढ झाली आहे. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या दाखल गुन्ह्यांच्या तपासाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यासमोर आहे.
Post a Comment