श्रीरामपूर प्रतिनिधी- ओमायक्रॉन( Omicron) या जलद गतीने पसरणाऱ्या कोविड विषाणू प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.कोविड-19 च्या संभाव्य गंभीर परिणाम तसेच लक्षणांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. तथापि श्रीरामपूर तालुक्यात प्रशासनाकडून वारंवार आवाहनासह दररोज विविध ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करून देखील लसीचा पहिला डोस अद्याप (18 वर्षांहून जास्त वयाच्या) जवळजवळ 65-70 हजार नागरिकांनी घेतलेला नाही. तसेच साधारण 33 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याची मुदत उलटून गेली असून देखील अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.म्हणजेच तालुक्यातील अंदाजे एक लाख (18 वर्षांवरील) सज्ञान व्यक्ती,लसीचा मुबलक पुरवठा उपलब्ध असूनदेखील कोविड पासून जाणीवपूर्वक सुरक्षित झालेले नाहीत. लस न घेणाऱ्या व्यक्तींच्या स्वतःच्या जीविताबाबतची ही उदासीनता भविष्यात गंभीर स्वरूपाची वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण करू शकते.तरी लसीकरण न झालेल्या सर्व नागरिकांना पुनःश्च तात्काळ नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणासोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे,मास्कचा वापर करणे या उपायांचा अवलंब करणे अनिवार्य आहे.पुढील काळात प्रशासनाचे भरारी पथके बाजारपेठेत,मंगल कार्यालय अशा गर्दीच्या ठिकाणी अचानक भेटी देतील व कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचा भंग झाल्याचे, प्रत्येक दुकानातील सर्व कर्मचारी व त्यावेळी असलेल्या ग्राहकांचे दोन्ही डोस लसीकरण झालेले नसल्याचे ( हे तात्काळ तपासण्याची व्यवस्था अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे ) व मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा आस्थापना,दुकाने तात्काळ सिलबंद करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.समाजातील जबाबदार व्यक्ती,संस्था,घटकांनी आपापल्या परीने जनमानसात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करावी व 100% लसीकरण पूर्ण करून श्रीरामपूर तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण सर्वांनी तोंड दिलेल्या भयावह स्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती तहसिलदार तथा इनसिडेंट कमांडर,श्रीरामपूर.
Post a Comment