मुंबई,नाशिक-गेल्या तीन दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्याच्या चिंतेत भर पडलेली असतानाचा नाशिकमध्येही काल (दि ३०) ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे....राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टास्क फोर्स आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याने घेतलेला निर्णय जसाच्या तसा नाशिक जिल्ह्याला लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हटले आहे. राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार सांस्कृतिक, धार्मिक , राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.करोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील असेही काल मध्यरात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्ण दगावल्याची नोंद आहे. राज्यात काल(दि ३०) एकूण १९८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात आतापर्यंत ४५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
Post a Comment