निलंबित API चा DYSPवर गोळीबार : दोन मुलांना ठेवले होते डांबून.

राहुरी ( अहमदनगर ) : डिग्रस (ता. राहुरी) येथे आज (गुरुवारी) सकाळी एका निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने एका विवाहित महिलेच्या मुलांना त्यांच्या राहत्या घरात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने उपअधीक्षक मिटके बचावले. 

सुनिल लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे. तो पहाटे पासून घरात प्रवेश करण्यासाठी दबा धरून बसला होता. त्याने आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान एका विवाहित महिलेच्या घरात प्रवेश केला.

आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहित महिलेच्या लहान मुलांना डांबून ठेवले. त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरत त्या महिलेला बाहेर येण्यास सांगितले. मात्र महिलेनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली.

त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक मिटके घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर मिटके यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती मिटके यांचा डोक्याजवळून गेली. मिटके थोडक्यात बचावले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण डिग्रस गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, आरोपीने मागील आठवड्यात 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता त्या विवाहित महिलेला राहुरी शहराजवळ अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. त्यांना शरीर संबंधाची मागणी करून, 8 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी घटनेच्या रात्री महिले आरोपीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण, आर्म ॲक्ट, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तोच गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने आजचे कृत्य केल्याचे समजते.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता डिग्रस येथे घटनास्थळाची पाहणी केली.





Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget