देवळाली प्रवरा - २७ एप्रिल - देवळाली प्रवरा व लगतच्या बत्तीस गावांसह संपुर्ण राहुरी तालुक्यात नवीन रेशन कार्ड धारक नागरिक प्राधान्य कुटुंब योजनेत नसल्याने रेशन दुकानातील मोफत व स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याने तातडीची उपाययोजना करणे कामी आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब, राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे, आमदार लहुजी कानडे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, प्रांत डॉ दयानंद जगताप व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन दिले आहे. ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना लॉकडाउनमुळे बहुतेक नागरिकांच्या हाताला काम नसल्याने या नवीन रेशन कुपन धारकांची सर्व भिस्त स्वस्त धान्य दुकानातील धान्यावर अवलंबून आहे. तथापि प्राधान्य कुटुंब योजनेपासून हे सर्व नवीन रेशन कुपन धारक कुटुंबे वंचित असल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नाही. म्हणून आज लॉकडाउन काळात त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. राहुरी तालुक्याचा इष्टांक शिल्लक नाही, नवीन इष्टांक वाढवून मिळेपर्यंत या नवीन कुपन धारकांना स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध करून देता येत नाही अशी माहिती मिळत आहे. राहुरी तालुक्यात अजूनही प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेपासून कित्येक कुटुंबे वंचित असल्याने कृपया या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून लाभ मिळणेसाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व उपासमारीपासून या कुटुंबांना वाचवावे अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी निवेदनात विनंती केली आहे.
Post a Comment