अहमदनगर-रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळा बाजार विक्री करणाऱ्या दोघा मेडिकल चालकांसह डाॅक्टर दांपत्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार मधील म्हस्के हाॅस्पिटलचे डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के, डॉ. कौशल्या किशोर म्हस्के (दोघे रा. वडारवाडी, भिंगार), प्रसाद दत्तात्रय अल्हाट (वय 27 वर्ष रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर), रोहित अर्जुन पवार (वय 22 रा. साकत ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.औषध प्रशासन विभागाचे जावेद शेख यांनी फिर्याद दिली आहे. प्रसाद अल्हाट व रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली असून म्हस्के डाॅक्टर दांपत्य पसार झाले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. 15 रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिंगारमध्ये डाॅ. किशोर म्हस्के यांच्या हाॅस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. असे असताना प्रसाद अल्हाट हा रोहित पवार याच्या मदतीने व म्हस्के हॉस्पिटलमधील म्हस्के डॉक्टर दांपत्यांशी संगनमत करून चैतन्य मेडिकल या ठिकाणावरून बेकायदेशीररित्या मिळवून करोना रुग्णांचा तपासणी अहवाल नसताना 4 हजार 800 रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावाने काळ्याबाजारात 12 हजार रुपये किमतीला विक्री करताना मिळून आले आहे.पोलिसांनी कलम 420, 34 सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 चे 6 कलम, जीवनावश्यक वस्तूची अधिनियम 1955 चे उल्लंघन, तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहे.
Post a Comment