बुलडाणा - 31 जुलै
स्वतंत्र अधिवास अन् वाघिनीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 कि.मी.चा प्रवास करत बुलडाणा नजीकचे ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या C-1 वाघाचा एकांतवास संपणार असून त्याचे लवकरच एका वाघिन सोबत मनोमिलन होणार असल्याचे संकेत समितिच्या बैठकीत मिळाले असून त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष दिले जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात टी-1 या वाघिणीने 2016 मध्ये 3 पिल्लांना जन्म दिला होता.त्या पिल्ल्यांचे नामकरण सी-1, सी-2 आणि सी-3 करण्यात आले होते.या तीन्ही वाघांना 25 आणि 27 मार्च 2019 दरम्यान रेडीओ कॉलर लावण्यात आले होते. वाघांचे परिक्रमण तपासण्याच्या दृष्टीकोणातून हे रेडियोकॉलर महत्वपूर्ण ठरले आहे.यातील सी-1 हा सबअडल्ट वाघ महाराष्ट्र व तेलांगाना हे दोन राज्य व महाराष्ट्रातील 6 जिल्हे फिरून 5 महिन्यात 1300 कि.मी.चे अंतर पार करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 1 डिसेंबर 2019 ला पोहचला होता. 13 शे किलोमीटरची मुशाफिरी करणाऱ्या C-1 वाघाने 205 चौरस किलोमीटर मध्ये विस्तारलेले ज्ञानगंगा अभयारण्य पिंजुन काढले. डिसेंबर मध्ये C-1 वाघ ज्ञानगंगा अभयारण्य सोडून अजिंठा पर्वत रांगा ओलांडत अजिंठा लेणी व औटुंबर गौताळा अभयारण्य पर्यंत जावून पोहोचला होता. मात्र जानेवारी मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात परत आल्यानंतर त्याला योग्य अधिवास मिळाल्याने तो आज पर्यंत इथेच स्थिरावलेला आहे.या वाघाला एक वाघिन मिळावी,या साठी काय काळजी घ्यावी,काय उपाययोजना करण्यात याव्या ?या अभ्यासासाठी एक समिति गठित करण्यात आली आहे. या समितिची बैठक 28 मार्चला होणार होती मात्र लॉकडाउनमुळे तब्बल 4 महिन्या नंतर 28 जुलैला अमरावती येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीत समितीचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी,सदस्य बिलाल हबीब,संजय वडतकर,किशोर रीठे व मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.C-1 वाघाला एक वाघिन उपलब्ध करून देण्यास समिति अनुकूल असून काही महत्वपूर्ण बाबींवर ही चर्चा झाली आहे.त्यात अभयारण्यातील देवहारी गावाचे पुनर्वसन, अवैध चराई थांबवीने तसेच अभयारण्यातून जाणारा बुलडाणा-खामगांव हा मार्ग पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गची व्यवस्था करने हे महत्वाचे मुद्दे असून येत्या 6 महिन्यात काम करण्याचे ठरले आहे. वाघिन आल्यानंतर भविष्यात वाघांची संख्येत वाढ होणार ही गोष्ट लक्षात घेता वाघांसाठी 800 ते 1000 किलोमीटरचे क्षेत्र असणे आवश्यक असून त्या करीता काटेपुर्णा-ज्ञानगंगा-अंबाबारवा व मुक्ताई नगर असा एक सुरक्षित कॉरिडोर करण्याचे मत वाइल्ड लाइफ इंटिट्यूट ऑफ इंडियाचे बिलाल हबीब यांनी व्यक्त केले आहे.
Post a Comment