श्रीरामपूर (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र कोरोनाच्या महामारी ने थैमान घातले असून प्रत्येक गावात आणि शहरात को रोना रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यामुळे सर्वसामान्य लोक हवालदिल झाले आहेत . शासकीय लॅब मध्ये रिपोर्ट यायला आठ दिवस उशीर लागत असल्यामुळे खाजगी लॅबला शासनाने परवानगी दिली . मात्र गेल्या काही दिवसातील त्यांचे अहवाल हे विश्वसनीय वाटत नसल्याने लोक संभ्रमात सापडले आहेत . येवल्याचे आमदार दराडे बंधू यांच्या घरात दोन दिवसात दोन वेगवेगळे अहवाल आल्याने आमदारांची ही कथा तर सर्वसामान्यांची कोण ऐकणार व्यथा अशा प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहेत . आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह कुटुंबातील लोक येवला येथे पॉझिटिव्ह दाखवण्यात आले . दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःची मुंबईमध्ये चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली .नंतर त्यांनी मुंबईचे लॅबवाले येवल्याला पाठवून आपल्या कुटुंबीयांची पुन्हा चाचणी केली असता ती देखिल निगेटिव्ह आली . म्हणजे दोन दिवसात दोन प्रकारचे रिपोर्ट प्राप्त झाल्याने राज्यांमध्ये तो एक चर्चेचा विषय झाला आहे . एकाच घरामध्ये दोन आमदार असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्व शासकीय यंत्रणा दिमतीला असताना अशा पद्धतीने संभ्रमीत करणारे रिपोर्ट येत असतील तर सामान्य लोकांची काय कथा आणि त्यांनीकुणाला सांगायचे आपल्या व्यथा अशी अवस्था लोकांची झाली आहे . खासगी रुग्णालयात इलाज करण्यासाठी मोठा खर्च येतो . त्याचबरोबर शासकीय अहवाल उशिरा येत असल्याने लोक खाजगी लॅबमध्ये स्त्राव चाचणी करीत आहेत . परंतु तेथून मिळणारे रिपोर्ट मात्र धक्कादायक असतात . कोणताही त्रास नसताना पॉझिटिव अहवाल ही एक नित्याची बाब झाली आहे . मात्र असे अहवाल आले तरी लोकांनी घाबरून न जाता या कोरोनाचा मुकाबला करावा असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे . बरेचसे रुग्ण हे केवळ भीतीनेच गर्भगळीत होऊन मृत्यूला सामोरे जात आहेत . तेव्हा कोरोना रोगाची विनाकारण कोणीही भीती बाळगू नये . अहवाल जरी पॉझिटिव्ह आला तरी योग्य प्रकारे उपचार करून घ्यावेत . न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा . असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे .
*श्रीरामपुरात वैद्यकीय गोंधळ*
शहर आणि तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असले तरी त्यांची नेमकी संख्या किती हा महत्त्वाचा प्रश्न गेले चार दिवस तालुक्यात चर्चिला जात आहे . कारण तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या तिघांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने तसेच खासगी अहवाल वेळेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहोचत नसल्याने आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे . कोरोना रुग्णाच्या संख्येबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर अफवांचे सुद्धा पीक आले असून या भागात दोन लोकांना कोरोना झाला, त्या भागात चार लोकांना कोरोना झाला अशा कपोलकल्पित चर्चा आहे त.
*नागरी आरोग्य केंद्र म्हणजे असून ताप नसून संताप*
नगरपालिके मार्फत चालवले जाणारे नागरी आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना ही सध्या शोभेची वस्तू बनली आहे. एकेकाळी नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याचा मोठा नावलौकिक होता. त्या ठिकाणी महिलांचे बाळंतपण, आवश्यक तपासण्या, छोटे ऑपरेशन केले जात होते. मात्र सध्या अशा कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध नाही. फक्त लहान मुलांचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी होते. गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. मात्र शहरापासून लांब असल्याने बरेच लोक त्या ठिकाणी जाणे टाळतात. नगरपालिकेने स्वतःचे सुसज्ज असे सरकारी रुग्णालय उभारावे. त्याचबरोबर त्याचा विस्तार शहराच्या इतर भागातही करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. इतर प्रश्नांवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आरडाओरडा करणारे नगरसेवक सरकारी दवाखान्याच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. याबाबतही शहरातील जनतेत नाराजीची अशी भावना दिसून येत आहे .
Post a Comment