श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील वार्ड नंबर दोन हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर महसूल वैद्यकीय व पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने लोकांशी वागत आहे त्याबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष असून प्रशासनाला सहकार्य करण्याची लोकांची भूमिका असताना पोलीस मात्र त्रास देण्याच्या हेतूने काम करीत आहेत . त्यामुळे जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करीत असताना प्रशासन मात्र सहकार्य करीत नसल्याची नाराजी वार्ड नंबर 2 मधील नगरसेवकांनी व्यक्त केली .
निमित्त होते नगर पालिका शाळा क्रमांक पाच मध्ये आयोजित केलेल्या होमिओपॅथिक फोरमच्या औषध वाटप शिबिराचे . याठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी वार्ड नंबर 2 मध्ये आरोग्य यंत्रणेमार्फत गेल्या चार दिवसापासून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली . जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रुग्णांची रॅपीड चाचणी या भागांमध्ये करण्यात आली असून आरोग्य यंत्रणेच्या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी रॅपीड टेस्ट ही पूर्णता विश्वास पात्र नाही. राजस्थान सरकारने त्यावर बंदी घातली आहे असे असताना जोपर्यंत दुसऱ्या चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत एखाद्या रुग्णाला covid-19 म्हणून घोषित करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण झाली आहे. अशा रुग्णांना घरीच होम कोरंटाईन केले पाहिजे. दुसऱ्या चाचणीत रुग्ण बाधित आढळला तर त्याला कोविड सेंटर'मध्ये नेण्यास आमची हरकत नाही असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातून आणीबाणीच्या प्रसंगी एक रस्ता चालू ठेवण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन त्याला प्रतिसाद देत नाही असा ठपका ठेवला . लोकांना गॅस टाक्या खांद्यावर उचलून बरेच लांब जावे लागत आहे . त्यामुळे एक रस्ता चालू ठेवून तेथे पोलिस बंदोबस्त द्यावा .गरजूंना तेथून सोडण्यात यावे अशी मागणी केली .
नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र असताना त्या भागामध्ये अशा प्रकारची चाचणी होत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगून सर्वच लोकांची चाचणी करण्यास आमची हरकत नाही . मात्र त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे . अनेक प्रकारच्या अफवा पसरल्याने आरोग्य यंत्रणेला काम करण्यात अडचणी येत आहेत . नागरिकांचा विश्वास संपादन करून काम केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतील . त्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत . प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन देखील एक रस्ता सुरू केलेला नाही . त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस जनतेला सहकार्य करीत नाही .लोकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत असे सांगून कोरोनाच्या संकटाचा मुकाबला सर्वांनी मिळून केला पाहिजे असे सांगून विनाकारण वार्ड नंबर 2 बदनाम करू नका असेही त्यांनी आरोग्य अधिकारी व पोलिसांना सुनावले.
यावेळी नगरसेवक मुक्तार शहा, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, अल्तमश पटेल, अॅड .समीन बागवान, सलीमखान पठाण, तोफिक शेख, सोहेल बारूद वाला,जावेद शेख आदी उपस्थित होते.
*मदरसा देण्याची तयारी*
संशयित रुग्णांचा अंतिम अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना इतरत्र कोरंटाईन न करता घरीच किंवा आमच्या परिसरातच होम कोरंटाईन करण्यात यावे असे सांगून अंजुमभाई शेख यांनी कोरनटाईन सेंटर म्हणून आपला मदरसा रहमत ए आलम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.
*प्रशासनाकडून दुर्लक्ष*
मिल्लत नगर वैदुवाडा पूल व फातेमा कॉलनी सुलतान नगर पूल या ठिकाणी पाटाच्या पुलावर पालिकेतर्फे पाईप बांधून कठडे तयार करण्यात आले होते . मात्र दोन्ही भागातील लोकांनी हे पाईप सोडून येण्या जाण्याचा रस्ता चालू केला आहे . त्या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या शिक्षकांनी लोकांना रोखल्यास त्यांना दमबाजी करण्यात येते . याबाबत प्रांत,तहसीलदार, नगराध्यक्षा,नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे चार दिवसापासून तक्रारी करून ही सर्वच प्रशासनाचे घटक या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने वार्ड नंबर 2 प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा उद्देश सफल होणार नाही . या दोन्ही पुलावरून भल्या सकाळी तसेच रात्री अनेक लोक आपल्या दुचाकी,चारचाकी गाड्या घेऊन जातात. त्यामुळे वार्ड नंबर 2 मधील संसर्ग इतर भागातही पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे .
Post a Comment