हमदनगर (प्रतिनिधी) शाळेत गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुख कांता गणपत घावटे व कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोंडाजी सोनवणे यांना तात्पुरते निलंबित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी बुधवारी (दि. 6) काढला. यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.कांता घावटे बारगाव नांदूर केंद्र शाळेत केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग केला होता. यावर राहुरी गटशिक्षणाधिकार्यांनी जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला होता. यानंतर नगर व जामखेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांनी संयुक्त चौकशी करून जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला होता. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्यांना काही काळासाठी पदावरून दूर केले आहे. याकालावधीत शेवगाव पंचायत समिती मुख्यालयात त्या कार्यरत असणार आहे. तेथील गट शिक्षणाधिकार्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष सोनवणे पदावर असताना त्यांनीही महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 नियम 3 चा भंग केला होता. कोपरगाव गटशिक्षणाधिकार्यांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर केला होता. तसेच राहता गटशिक्षणाधिकारी व श्रीरामपूर विस्तार अधिकार्यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी पदावरून काही काळासाठी दूर केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे मुख्यालय श्रीगोंदा पंचायत समिती असणार आहे. तेथील गटशिक्षणाधिकार्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
Post a Comment