Latest Post

अहिल्यानगर,(४ जून/गौरव डेंगळे):

अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांवरील वयोगटासाठी भव्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा दिनांक ६ व ७ जून २०२५ रोजी दोन प्रमुख ठिकाणी पार पडणार आहेत — कराळे हेल्थ क्लब, सावेडी आणि वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर.


स्पर्धेतील खेळ प्रकार:


या उत्सवामध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि पोहणे (स्विमिंग) या प्रमुख खेळांचा समावेश असून, खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.


स्पर्धेतील सहभागी संघ:


ही स्पर्धा चार संघांमध्ये खेळवली जाणार आहे. त्या संघांची नावे आणि प्रमुख खेळाडू पुढीलप्रमाणे:



🟢 रायगड किंग्स


प्रमुख खेळाडू:

सतीश गायकवाड, घनश्याम सानप, प्रमोद आठवाल, शैलेश गवळी, कृष्णा लांडे, प्रशांत गंधे, बंटी गुंजाळ, सतीश झेंडे, विजुभाऊ मिस्कीन, पुरोहित सर, अजय पवार, संतोष घोरपडे, सचिन तिवारी, वैभव पवार



🔵 राजगड कॅपिटल


प्रमुख खेळाडू:

संदेश भागवत, संतोष ठाणगे, विल्सन फिलिप्स, अनिल भापकर, सचिन पठारे, डेविड माकासरे, किशोर गांधी, गणेश तलवारे, सोमानी सर, संतोष वाबळे, शब्बीर सर, प्रशांत कोळपकर, जयंत जाधव, संतोष गाडे



🔴 प्रतापगड वॉरियर्स


प्रमुख खेळाडू:

डॉ. विजय म्हस्के, विशाल गर्जे, मोहित भगत, रामेश्वर सर, रोनक फर्नांडिस, दिनेश भालेराव, निलेश मदने, संजय साठे, विजय पवार, कुलकर्णी सर, शंतनू पांडव, महेश पटेकर, सचिन जावळे, प्रशांत निमसे, विनायक भूतकर



🟡 सिंहगड लायन्स


प्रमुख खेळाडू:

सुनील गोडळकर, विकास परदेशी, संजय पाटील, मुकुंद काशीद, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर खुरांगे, अविनाश काळे, प्रदीप पाटोळे, कल्पेश भागवत, अजय बारगळ, सचिन सप्रे, प्रवीण कोंडावळे, दिनेश मोरे, हेमंत कुलकर्णी, सचिन गायकवाड



पंचमंडळी (रेफरीज):


या स्पर्धेसाठी पंच म्हणून मनीष राठोड, अमित चव्हाण, शदाब मोमीन आणि हर्षल काशीद हे जबाबदारी पार पाडणार आहेत.



ही स्पर्धा का खास?


४० वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानी स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे.


फिटनेस, खेळातील शिस्त, सामाजिक स्नेह यांचा संगम असलेली ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.


निवृत्तीनंतरही सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम!


उद्घाटन व समारोप:


या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व समारोप सोहळे प्रमुख क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे व संघांना सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा एक प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण करणार असून, वयोमानानुसारही 'खेळ भावना' अमर आहे हे दाखवून देणारी ठरेल.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक रवी गाढे आणि नामवंत कबड्डीपटू महेश कोल्हे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, बेंगळुरू येथे आयोजित सहा आठवड्यांचा कबड्डी सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

या कोर्समध्ये आधुनिक प्रशिक्षण तंत्र, खेळातील रणनीती, शारीरिक तंदुरुस्ती,आहार नियोजन, मानसिक तयारी तसेच खेळाडू व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.देशभरातील अनेक प्रशिक्षक आणि खेळाडू या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते.

रवी गाढे आणि महेश कोल्हे यांनी या कोर्समध्ये विशेष कामगिरी केली असून, दोघांनाही संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अर्जुन पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक भास्करन सर यांचे दोघांनाही मार्गदर्शन लाभले.

रवी गाढे हे आझाद क्रीडा मंडळ, टाकळीभान येथून कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कबड्डीपटूंनी प्रो कबड्डी लीगमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.


महेश कोल्हे हे देखील याच मंडळाशी संबंधित असून, प्रशिक्षक म्हणून त्यांची वाटचाल अधिक बळकट होत आहे. त्यांच्या यशाबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती,सहकारी, मित्रपरिवार व चाहत्यांकडून दोघांचेही अभिनंदन केले जात आहे.

बेलापूर (श्रीरामपूर) येथील गंगाधरशास्त्री बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी चंद्रशेखर आझाद मैदानाजवळ एक दिवसीय मोफत वैद्यकीय तपासणी व पाणी गुणवत्ता तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती साळुंखे परिवारात वतीने देण्यात आली आहे.                                    साळुंके सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की. या शिबिरात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत तज्ज्ञ वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाईल. या तपासणीत सांधेदुखी, पोटदुखी, मधुमेह, थायरॉईड आणि दम्यासारख्या विविध आजारांसाठी आयुर्वेदिक उपचारांसह सखोल मार्गदर्शन केले जाईल शिबिरात येणाऱ्या रुग्णांना औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांसाठीही विशेष पाणी गुणवत्ता तपासणीची सोय करण्यात आलेली आहे ज्यात विहिरीतील पाणी नमुन्यांची तपासणी करून पाण्याच्या गुणधर्मांवर आधारित विस्तृत अहवाल देण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतीवर आणि उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात येईल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना मोफत आरोग्य सेवांचा लाभ देणे तसेच शेतकऱ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या वापराची जाणीव करून देणे आणि शेतीसाठी आवश्यक त्या मानसिकतेची निर्मिती करणे आहे. प्रतिष्ठानच्या वरिष्ठांनी पंचक्रोशीतील सर्व नागरिक व शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे मनापासून आवाहन सर्वश्री श्री पुरुषोत्तम गंगाधर शास्त्री साळुंके , श्री प्रदीप गंगाधर साळुंके ,  श्री प्रताप गंगाधर साळुंके, मयूर पुरुषोत्तम साळुंके अजिंक्य पुरुषोत्तम साळुंके आणि समस्त गंगाधरशास्त्री बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान, बेलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे

श्रीरामपूर/गौरव डेंगळे/१९/५: सोमैया विद्या विहार विद्यापीठ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय समर कॅम्पमध्ये श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथील १०४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिनांक ५ मे ते १७ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या या विशेष शिबिरात ८६ मुले व १८ मुली सहभागी झाल्या.लक्ष्मीवाडी, साखरवाडी, नरेशवाडी व शारदा शाळेतून एकूण २०० विद्यार्थ्यांचा सहभाग हा ग्रामीण भागातील शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेला महत्वपूर्ण पाऊल ठरला.

१३ दिवस घरापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी नवे अनुभव घेत खेळ, शिस्त, स्वावलंबन व सहकार्य यांचे महत्त्व आत्मसात केले. या काळात क्रिकेट, बॅडमिंटन, स्क्वॉश, बास्केटबॉल, पोहणे, दोरी चढणे, फुटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, जुडो, कराटे, टेबल टेनिस, फिटनेस ट्रेनिंग व पिकलबॉल अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जोमाने भाग घेतला.खेळांसोबतच विद्यार्थ्यांनी VTI (व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) मध्ये प्लंबिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर, एसी रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उपयुक्त व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.

शिबिरात विद्यार्थ्यांनी सोमैय्या कॅम्पसवरील विविध महाविद्यालयांना भेटी देत उच्च शिक्षणाच्या संधी व करिअरचे विविध पर्याय जाणून घेतले. विशेष आकर्षण ठरले भारताचे माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांच्याशी झालेली थेट भेट आणि प्रेरणादायी संवाद.

समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि संचालन स्वतः हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वगुणांचे व संघटनकौशल्याचे सर्वांनी कौतुक केले.समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना सोमय्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री समीर सोमैया सर म्हणाले, “प्रत्येकाने नेहमी सत्य बोलले पाहिजे आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला पाहिजे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रामाणिकपणा, सहकार्य आणि करुणा ही अत्यंत आवश्यक मूल्ये आहेत.”ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ यशाकडे धाव घेत न बसता, चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अपयशातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इथे मिळालेला अनुभव तुमच्या आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे.”या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, त्यांनी प्रत्येक सत्रात मन:पूर्वक आणि उत्साहाने सहभाग घेतला.श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्यातर्फे सोमैया ट्रस्टचे माननीय अध्यक्ष श्री समीर सोमैया सर यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले,की त्यांनी विद्यार्थ्यांना असा संस्मरणीय व अनुभवसमृद्ध शिबीर अनुभवायला दिला.हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शिबीर न राहता,एक जीवनमूल्य शिकवणारी शाळा ठरली.

क्रीडा/गौरव डेंगळे/श्रीरामपूर:  ना गॉडफादर, ना राजकीय पाठिंबा — फक्त निखळ क्रीडाप्रेम!


भारतीय क्रीडा क्षेत्रात अनेक जण आपापल्या मार्गाने प्रगती करत असतात, पण पार्थ दोशी यांची कहाणी खास आहे. एक ग्रामीण मुलगा, ज्याच्याकडे ना मोठ्या ओळखी होत्या, ना कुणाची पाठराखण — पण ज्याच्या मनात खेळासाठी "काहीही" करण्याची मानसिकता होती, तो आज School Games Federation of India (SGFI) चा CEO बनला आहे

👉 टिळकनगर गावातून सुरू झालेला प्रवास!

पार्थ दोशी यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील टिळकनगर गावात झाला. आई मुख्याध्यापिका आणि वडील इंजिनिअर — साधं, मध्यमवर्गीय कुटुंब. शाळेपासूनच बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांमध्ये त्यांचा ओढा होता. बालवयातच त्यांनी मैदानावर स्वप्न बघायला सुरुवात केली.

👉 "माझं स्वप्न थांबवू शकत नाही!"


खेळासाठी मैदान नसेल, तर ते तयार करायचं; साहित्य नसेल, तर स्वतःच्या खिशातून विकत घ्यायचं — ही पार्थची जिद्द होती. कोणतीही सुविधा नसतानाही त्याने कधी तक्रार केली नाही. त्याचं एकच तत्व होतं — खेळासाठी काहीही

👉शिक्षण आणि अनुभव — दोन्ही हातात हात घालून!

खेळात उत्कर्ष मिळवतानाच पार्थने क्रीडा व्यवस्थापनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. देशविदेशात विविध स्तरांवर अनुभव घेत, त्यांनी स्वतःला तयार केलं. कोणत्याही शिफारशीचा आधार न घेता, फक्त प्रामाणिक कष्टाच्या जोरावर ते पुढे सरकत गेले.

👉 महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष!

पार्थ दोशी हे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. त्यांच्या नेतृत्वात संघटनेत नवा जोश आणि पारदर्शकता आली. ग्रामीण खेळाडूंना संधी, चांगल्या सुविधा आणि खुली निवड प्रक्रिया — यामुळे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेला नवसंजीवनी मिळाली.

👉 नगर जिल्ह्यात तीन राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन — एक क्रांतिकारी पाऊल!

पार्थ यांच्या पुढाकारामुळे नगर जिल्ह्यात तब्बल तीन राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय खेळाडूंशी संपर्क साधण्याची संधी मिळाली, स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा वाढल्या आणि जिल्ह्याचं नाव देशभर झळकू लागलं.

👉 SGFI चा CEO — स्वप्नपूर्ती आणि जबाबदारी!

शालेय क्रीडा क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या School Games Federation of Indiaच्या CEO पदावर पार्थ यांची निवड झाली. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते. पार्थ यांच्या नियुक्तीमुळे व्यवस्थापनात पारदर्शकता, गुणवत्ता आणि खेळाडू केंद्रित दृष्टिकोन येण्याची अपेक्षा वाढली.

👉 नव्या योजना आणि दूरदृष्टी

CEO म्हणून पार्थने ग्रामीण भागात अधिक स्पर्धा, गुणवत्ता-आधारित निवड प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना आणि पारदर्शकता यावर विशेष भर दिला. खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम करणं, ही त्यांची खरी ओळख ठरली आहे.

👉 भारताचं आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व — ISF जनरल असेंब्ली,सर्बिया!

८ एप्रिल २०२५ रोजी पार्थ दोशी यांनी झ्लातिबोर, सर्बिया येथे पार पडलेल्या International School Sport Federation (ISF) च्या जनरल असेंब्लीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. विविध देशांतील प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांनी भारतातील क्रीडा क्षेत्रातील बदल, योजना आणि दृष्टीकोन मांडला.

त्यांनी ISF अध्यक्ष श्री. झेल्ज्को टॅनास्कोविच यांच्या सत्कार समारंभात देखील सहभाग घेतला. हा अनुभव भारताच्या शालेय क्रीडा विकासात मोलाची भर घालणारा ठरला.

👉 पार्थ दोशी यांचा संदेश:

माझं स्वप्न मोठं होतं, आणि माझं ध्येय स्पष्ट होतं — मग साधनं असोत की नसोत, मी मागे हटलो नाही.

👉 उद्या लाखो मुलांना प्रेरणा देणारा चेहरा!

पार्थ दोशी यांची वाटचाल ही केवळ त्यांच्या व्यक्तिगत यशाची कहाणी नाही, तर ती संघर्षातून घडलेल्या यशस्वी नेतृत्वाची प्रेरणादायक गाथा आहे. त्यांनी हे सिद्ध केलं की नुसती इच्छा नाही, तर जिद्द, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट दृष्टिकोन असेल, तर कुठलाही टप्पा दूर नाही.

पटणा (बिहार)/ गौरव डेंगळे/१५ मे २०२५:बिहारमध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत एकूण १५८ पदकांची कमाई केली आणि देशभरात आपला पहिला क्रमांक पक्का केला. या स्पर्धेत राज्याने ५८ सुवर्ण,४७ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांची भरघोस कमाई केली आहे.#महाराष्ट्राच्या_खेळाडूंची_बहारदार_कामगिरी!या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्याचं नाव उंचावलं. अ‍ॅथलेटिक्स, कुस्ती, जलतरण, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी आणि जिम्नॅस्टिकसारख्या खेळांमध्ये महाराष्ट्राने वर्चस्व प्रस्थापित केलं.#हरियाणा_व_राजस्थान_मागे_राहिले!महाराष्ट्राच्या पाठोपाठ हरियाणाने दुसरं स्थान पटकावत ११७ पदकं जिंकली. त्यानंतर राजस्थानने ६० पदकांसह तिसरे स्थान मिळवले.दिल्ली,कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांनाही महाराष्ट्राच्या तुलनेत कमी पदकं मिळाले.#प्रशासनाची_भूमिका_आणि_पुढील_योजना!राज्य सरकारने खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षकांची नियुक्ती, आर्थिक सहाय्य आणि आधुनिक प्रशिक्षण केंद्रांची उभारणी यांमध्ये भरीव योगदान दिले आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन स्तरावरून खेळाडूंना निवडून पुढे घेऊन जाण्याची मजबूत यंत्रणा यशस्वी ठरली आहे.

#क्रीडामंत्री_यांचे_वक्तव्य:

ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.आमच्या खेळाडूंनी संपूर्ण देशात सर्वोत्तम कामगिरी केली.आम्ही पुढेही त्यांना हवे ते सहकार्य देत राहू.


#महाराष्ट्रासाठी_पुढील_पाऊल – #आंतरराष्ट्रीय_यशया कामगिरीमुळे अनेक खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं प्रशिक्षण, फिजिओथेरपी, पोषण आहार, आणि मानसिक तयारी यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील.

श्रीरामपूर: येथील डी. डी. कचोळे विद्यालयाची इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी सायली अंबादास निकाळजे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तब्बल 85.7 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे सायलीने हे यश कोणत्याही खासगी शिकवणी (क्लास) किंवा अतिरिक्त मार्गदर्शन न घेता मिळवले आहे.

सायलीचे वडील रिक्षा चालक असून आई ग्रहणी आहे. घरात आईला तिच्या कामात मदत करत आणि शाळेतील अभ्यासावर लक्ष केंद्रित करत सायलीने हे यश मिळवले आहे. तिच्या या जिद्दी आणि मेहनतीच्या वृत्तीमुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डी. डी. कचोळे विद्यालयाचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी सायलीच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सायलीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget