अहमदनगर (प्रतिनिधी) पारनेर बस स्थानकाजवळ असलेल्या आंबेडकर चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून 22 वर्षीय तरुणावर दोघांनी तलवारीने खुनी हल्ला करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता घडली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव सौरभ उर्फ बंडू भिमाजी मते असे आहे. त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पारनेर पोलीस ठाण्यात गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून याअगोदर एकमेकांना बेदम मारहाण झाली होती त्याचेच रूपांतर बंडू मते याच्यावरील हल्ल्यात झाले. शुक्रवारी सकाळी बंडू मते हा आंबेडकर चौकातील चहाचे दुकान उघडून ते सुरू करण्याच्या तयारीत असतानाच दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यात सुरुवात केली व वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघांनी त्याच्या हातापायावर तलवार तसेच चॉपरने वार केले. दोघांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून दोघांनी डॉ. आंबेडकर स्मारकासमोर त्याच्यावर तलवार तसेच चॉपरने वार केले.घटनेची माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बंडू मते यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. भांडणाच्या वादातून गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे या दोघांनी हल्ला केल्या असल्याची प्राथमिक माहिती जखमी सौरभ मते यांनी पोलिसांना दिली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यासंबंधीची फिर्याद जखमीचे चुलते रामदास सोपान मते यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Post a Comment